पंचकर्म म्हणजे काय?
हा आयुर्वेदीय शोधन चिकित्सा प्रकार आहे.

आयुर्वेदात चिकित्सेचे महत्वाचे दोन प्रकार १)शमन आणि २) शोधन

(वात-पित्त व कफ हे त्रिदोष शरीराच्या संपूर्ण कार्यासाठी आवश्यक आहेत. हे समप्रमाणात असणे स्वस्थ शरीराचे लक्षण आहे.मात्र यांचा समतोल बिघडला तर हेच दोष शरीरधातु व मलांना विकृत करून रोगाची उत्पत्ती करत असतात.)

१)शमन-औषधे देउन वाढलेले दोष कमी करणे, कमी झालेले शरीरातील घटक, दोष प्रमाणात आणणे म्हणजे शमन चिकित्सा.
२)शोधन-दोष जर प्रमाणा बाहेर वाढलेले असतील किवा कुठल्यातरी शरीर घटकाच्या(शरीर धातू) आश्रयीत (चिकटून्/दडून)असतील तर त्याना त्या पासून मोकळे करून शरीरातून जवळच्या मार्गाने बाहेर काढणे म्हणजे शोधन चिकित्सा.
ही पंचकर्म कोणती ?

पंचकर्माच्या ५ मुख्य प्रक्रीया आहेत.
रोगाच्या स्वरूपानुसार त्या त्या दोषासाठी वेगवेगळ्या प्रक्रीया केल्या जातात.

पंचकर्म
१)वमन
२)विरेचन
३)बस्ती
४)नस्य
५)रक्तमोक्षण
हे शोधन कशा पद्धतीने करतात?
पूर्वकर्म :-
ह्या प्रक्रीया करण्यापूर्वी शरीरातील वाढलेले दोष जे शरीर घटकाना काही वेळा चिकटून बसलेले त्यात लपून बसलेले असतात त्याना त्या पासून मोकळे करून मध्य मार्गात (आतड्यात )आणून जेणेकर्रून ते सहजगत्या शरीराबाहेर काढता येतील अशी योजना करावी लागते. ह्यालाच पूर्वकर्म म्हणतात.ही २ आहेत
१)स्नेहन २)स्वेदन

१)स्नेहन- काही दिवस आधी पासून पोटातून औषधी तेलं /तुपं एका विशिष्ट मात्रेत प्यायला देउन,तसेच आंगाला मालिश करून (थोडक्यात शरीराला आंतरबाह्य स्निग्ध करून ) चिकटून बसलेले दोष सुटे केले जातात.
जस तेल लावलेल्या भांड्याला पदार्थ चिकटत नाही , किवा स्निग्ध ते मुळे चिकटून बसलेले घटक सुटे होतात त्याच प्रमाणे हे घडते.
२)स्वेदन-शरीराला वेगवेगळ्या प्रकाराने घाम येइल असे उपाय करून (वाफेचा शेक, सोना किवा स्टीम बाथ ई.)देउन दोष उष्णते मुळे सुटे झालेले दोष वितळून पाझरत पाझरत मध्यमार्गात येतात.
दोषांच्या शक्ती नुसार प्रमाणानुसार तसेच आजारानुसार हे पूर्वकर्म साधारणपणे ३ ते ५ दिवस करावे लागते
त्यानंतर रुग्णाचे पोट आणि नाडी तपासून गरजेनुसार जवळच्या मार्गाने दुषित दोषांना शरीरातून बाहेर काढले जाते.
मुख्य कर्म
१)वमन-दोषाना उर्ध्व मार्गाने (वरच्या बाजूने) शरीराबाहेर काढणे-अर्थात उलटी वाटे तोंडावाटे दोषाना बाहेर काढणे.
ही क्रिया प्रामुख्याने ज्या रोगात दुषित कफ दोषाचे प्रमाण शरीरात वाढलेले असते अशा रोगात करतात(अनेक प्रकारचे त्वचारोग्,आम्लपित्त्,दमा ई.).पूर्वकर्मा नन्तर आतड्यात वरील बाजूला किवा जठरात जमा झालेले दोष उलटीचे औषध,सहज उलटी होइल अशा काढ्याबरोबर /दुधाबरोबर प्यायला देउन. तोंडातून बाहेर काढले जातात.
प्यायला दिलेला काढा,औषध याचे प्रमाण मोजलेले असते.उलटी वाटे बाहेर पडलेले द्रव्य ही मोजले जाते त्याचे स्वरूप वास याची नोंद ठेवली जाते.
२)विरेचन- खालच्या बाजूने म्हणजे मलमार्गाने दोषांना रेचक औषधांचा वापर करून बाहेर काढणे म्हणजे विरेचन.विरेचन हा वाढलेल्या पित्त दोषाचा प्रमुख उपचार आहे.अनेक प्रकारचे त्वचारोग ज्यात लाली जळजळ असते ,पित्ताची डोकेदुखी,आंगावर गांधी उठण ,काही प्रकारचे अर्श (पाईल्स) ,कावीळ तसेच ज्या रोगात विकृत पित्त वाढलेले आहे अशात विरेचन दिले जाते.याच्यातही मलवेगाची त्याच्या स्वरूपाची नोंद ठेवली जाते
३)बस्ती- ही वात दोष वाढलेला असल्यास मुख्य उपचार म्हणून दिली जाते.बस्ती म्हणजे औषधी काढे,कधी केवळ तेल असे गुदद्वारातून मोठया आतडयात सोडले जाते. यामुळे आतडयातील कोरडे मलाचे थर सुटतात. तेल आतडयात शोषले जाऊन काही आवश्यक घटकांचा पुरवठा होतो.अनेक वातव्याधी(सांधेदुखी,कंबर दुखी),हाडांचे रोग,आतड्यातील विकार ,त्वचारोग यात बस्ती ची उपाययोजना केली जाते.
4)नस्य-नस्य म्हणजे नाकात औषधी तेलाचे थेंब किंवा चूर्ण टाकणे.मानेच्या वरच्या अवयवांचे आरोग्य सुधारण्यास, सायनस मोकळे होण्यास, काही प्रकारच्या डोकेदुखीत नस्याचा उपयोग होतो.ज्या आजारांचा मेंदूशी जवळचा संबंध आहे अशात (पक्षाघात) , आर्दीत (facial palsy) याचा बराच चांगला उपयोग होतो.
५)रक्तमोक्षण -रक्तमोक्षण म्हणजे दूषित रक्ताला शरीराबाहेर काढणे. आयुर्वेदात यासाठी जळवांचा वापर करतात. पण त्वचाविकारात जेथे चिकट स्त्राव होत असतो तिथे जळवा लागत नाहीत अशाठिकाणी काही वेळा सिरीन्जीन्ग करून रक्त काढले जाते
पंचकर्मा शी निगडीत काही उपचार आहेत.जे कहीवेळा एखादा पंचकर्मापैकी चा उपचार करताना सहाय्य म्हणून केले जातात किवा काहीवेळा मुख्य उपचार म्हणूनही करावे लागतात
वेगवेगळे अभ्यंगाचे प्रकार ,शेकाचे-स्वेदनाचे प्रकार, शिरोधारा ,कटीबस्ती,जानुबस्ती ई.
ही पंचकर्म कधी करतात?
१) आजारानुसार पंचकर्म-
आयुर्वेदात व्याधीच्या अवस्थांचे वर्णन आहे .पेशंट ची आजाराची लक्षणे पाहून ,नाडी आणि पोट तपासून वैद्यास व्याधीची अवस्था कळते.अशा काही अवस्थांमध्ये गोळ्या काढे औशधे देऊन व्याधी आटोक्यात राहीनासा,बरा होण्यासारखा नसतो.अशावेळी हे उपचार उपयोगी ठरतात.
२)आजाराचा जोर कमी करण्यासाठी लाक्षणिक उपचार म्हणूनही काहीवेळा हे उपचार करावे लागतात.
उदा.खूप दिवस मलप्रव्रुत्ती न झाल्यास , मलाचे खडे झाल्यास बस्ती देतात. दम्यात कफाची घरघर वाढलेली असताना कधीकधी तात्कालिक उपाय म्हणून वमन द्यावे लागते.
३)ऋतू नुसार शरीरात दोषांचे प्रमाण कमी जास्त होत असते, अशावेळी काही आटोक्यात असलेल्या(सध्या लक्षणे न दिसणार्या) व्याधी बळावतात्,जोर धरतात अशा व्याधीत त्यापूर्वीच्या ऋतूत हे उपचार करावे लागतात.
४)विशिष्ट आजार लक्षणे नसणार्या व्यक्तीस तिच्या शरीरातील दोषबदल पाहून ऋतू नुसार एखादा उपचार सुचवला जाउ शकतो. उदा. स्थूल (obese ) स्वेदन.
५) आयुर्वेदात सांगितलेल्या रसायन उपचारापूर्वी हे उपचार केले जातात
ह्या पंचकर्माचा साधारण कालावधी काय?
प्रथम पंचकर्म उपचार म्हणजे हे सगळे उपचार एकत्र घ्यायचे हा समज चुकीचा आहे.
व्याधीच्या गरजेनुसार,ऋतूनुसार्,प्रक्रुती(body constitution)नुसार रुग्णास उपचार केला जातो.
काहीवेळा शोधन उपचारापूर्वी चे पूर्वकर्म (स्नेहन आणि स्वेदनाचे उपचार ) केल्यानंतर दोषांची गती ( दिशा पाहून रुग्णाचे पोट आणि नाडी तपासून गरजेनुसार जवळच्या मार्गाने दुषित दोषांना) शरीरातून बाहेर काढले जाते. अशावेळी वमनासाठी औषध द्यायचे का विरेचनासाठी हे त्या त्या वेळी ठरते.
दोषांच्या शक्ती नुसार प्रमाणानुसार तसेच आजारानुसार पूर्वकर्म साधारणपणे ३ ते ५ दिवस करावे लागते
त्यानंतर रुग्णाचे पोट आणि नाडी तपासून गरजेनुसार वमन किवा विरेचन दिले जाते
बस्ती,नस्य हे उपचार काही दिवस सतत/दिवसाआड/एका दिवसातून दोनदाही गरजेनुसार करावे लागतात
रक्तमोक्षण त्या आजाराच्या लक्षणांनुसार करावे लागते.
काही आजारांमध्ये पूर्वकर्म (स्नेहन-स्वेदन) हीच मु़ख्य उपचार म्हणून केली जातात
पंचकर्मा साठी पथ्य :-
कोणत्याही उपचारात पथ्यास खूप महत्व आहे,मग ती कोणतीही उपचार पद्धती असो.
हे उपचार करण्यापूर्वी,ते सुरू असताना आणि त्यानंतरही काही दिवस आहार विहारा संबंधीचे पथ्य पाळावेच लागते.यात अगदी खाण्यापिण्यापासून ,गरम कपडे,आंघोळीसाठी गरम पाणी ,थंड हवेत न जाणे , दिवसा न झोपणे ई. सर्व काटेकोर पणे पाळावेच लागते.

इतर उपचारांप्रमाणेच ह्या उपचारातही अयोग- अतीयोग असे धोके असतात, मात्र अनुभवी,वैद्याकडून उपचार झाल्यास ते नगण्य असतात.
ह्या उपचारानंतर शरीर घटक दोषांचे प्रमाणात रहाणे योग्य आहारविहाराने,काही वेळा काही औषधांच्या सहाय्याने राखता येऊ शकते .
पण हे उपचार एकदा केले म्हणजे झाले असे नेहमीच नसते. बर्‍याच व्याधीत त्यांच्या अवस्थेनुसार्/ऋतू बदलान्चे परीणाम म्हणून नंतरही ते आवश्यकतेनुसार करावे लागतात.
वेगवेगळ्या व्याधीत,लक्षणानुसार,वयानुसार ह्या उपचारात वापरली जाणारी औषधी तेले-तुपे,काढे,शेकाचे प्रकार वेगवेगळे असतात.
या उपचारास मर्यादा आहेत, कोणावरही सरसकट हे उपचार करता येत नाहीत आजाराच्या विशिष्ट अवस्था,वय,गर्भार स्त्री,अती नाजुक प्रकृतीची माणसे हे अपवाद ठरू शकतात.
यासर्व उपचारापूर्वी,उपचार चालू असताना आणि पूर्ण उपचार संपल्यानंतर(त्यानंतर जावा लागणारा पथ्याचा कालावधी झाल्यावर) त्या त्या आजारानुसार लक्षणान्ची ,vital signs ची नोंद ठेवली जाते.

हा एक वैद्यकीय उपचार आहे.प्रशिक्षीत वैद्याच्या सल्याने ,त्यांच्या मार्गदर्शनाखालीच केला जावा.